बॅंकेतून ऑनलाइन पैसे गेलयास १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक करा डायल
बॅंकेतून ऑनलाइन पैसे गेलयास १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक करा डायल
तंत्रज्ञान जेवढे प्रगत होत जाते तेवढेच त्याच्यामागे धोकेही चालत येतात. ऑनलाइन चोरी हा त्यातलाच एक प्रकार! विशेष म्हणजे शिक्षित, अनुभवी असलेले व्यक्ती याला बळी (Online fraud) पडतात. तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे, तुमच्या पिन नंबरची मुदत संपली, तुमच्या खात्यात अमुक रक्कम जमा करायची आहे, अशा एक ना अनेक क्लूप्त्या वापरत सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवत असतात.
अशा सायबर गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने अशी यंत्रणा विकसित केली की ज्या माध्यमातून लोकांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने १५५२६० हा क्रमांक हेल्पलाइन म्हणून जारी केला आहे. ज्यांचे पैसे खात्यातून उडाले असतील त्यांनी त्वरित या क्रमांकावर कॉल करावा. कारण, सायबर गुन्ह्यांमध्ये वेळेला फार महत्त्व असते. जेवढ्या लवकर हेल्पलाइनवर कॉल कराल तेवढे गुन्हेगार शोधून काढण्यास आणि रक्कम परत मिळण्यास मदत होते.
इंटरनेटला कुठलीही भौगोलिक मर्यादा नसल्याने अगदी विदेशात बसलेला हॅकरही तुमच्या खात्यातील पैसे लंपास करू शकतो. अर्थात त्याला तुम्हीही मदत करीत असता ते ओटीपी सांगून अथवा एखादे ॲप डाउनलोड करून! कारण, हॅकर कितीही तरबेज असला तरी त्याला एकतर्फी हात साफ करताच येत नाही. आतापर्यंत देशात लाखो लोकांना याचा फटका बसला.
सात ते आठ मिनिटांत रक्कम होल्ड
सायबर गुन्हेगाराने चुना लावल्याचे कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.
यंत्रणा काम कशी करते?
हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.
एकप्रकारचे सुरक्षा कवच
http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था जुळलेल्या आहेत.
Comments
Post a Comment